छत्रपती संभाजीनगर उद्योग विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ (Skilled Workforce) तयार करण्यासाठी MIDC तर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत केली.
Table of Contents
Toggle६० हजार कोटींची गुंतवणूक – नवीन उद्योगांना चालना
सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध नामांकित कंपन्यांकडून करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी कंपन्या येथे उद्योग उभारण्यासाठी इच्छुक आहेत. या नव्या उद्योगांना प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
या केंद्रात दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतील. कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी एका संस्थेला देण्यात आली आहे. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी आणि उद्योगांवरील अतिवृष्टीचे संकट
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेती व उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उद्या प्रत्यक्ष पाहणी
शुक्रवारी उद्योगमंत्री सामंत हे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.